वटवृक्षाचं उन्मळणं केवळ भास
मृत्यू, ते अनादी सत्य, मरण, मौत, दिगंंतराची यात्रा, अनंताचा प्रवास... म्हणजे काय? काय? काय?... मरण येणं म्हणजे शरिराची चेतना अस्तंगत होणं. चेतनेचा निर्झर क्षणात पार्थिव होणं. उरलेल्या पार्थिवावर केवळ आणि केवळ विधी - संस्कारांचे उपचार करणं. क्षणात होत्याचं नव्हतं होणं. सगळंकाही इथेच जस्सच्या तस्सं सोडून जाणं. जीवन गाण्याचे शब्दच निशब्द होणं. वर्तमानाचा इतिहास होऊन जाणं किंवा स्मृती होऊन जाणं. लढता - लढता मृत्यूनं हौतात्म्याचं अमरत्व बहाल करणं. सगळ्याच कवच - कुंडलांचं निरुपयोगीत्व सिद्ध होणं. सुटले, सुटली म्हणून निश्वासांचंं उरणं. मुसमुसणार्या डोळ्यांमध्ये अश्रुंचं गोठणं. ’मी जाता राहिल काय...’ या जगरहाटीची जाणिव करुन देणं. जन्मभराच्या धावपळीतून अखेरचा तो निवांत, शांत क्षण मिळवणंं. नियतीशी उभा दावा मांडणार्यानं निशस्त्र सम्राटाप्रमाणे सन्मानानंं त्याच नियतीला शरण जाणं. डाव मोडणं कि अर्ध्यावर डाव सोडणंं. भौतिकाची दगदग संपवून मोक्ष मिळवणं.
काय असतं मरण? तुमचंं, आमचं, त्यांचंही अगदीच सारखं असतंं?... रणांगणावर धारातिर्थी पडलेल्याचं तिर्थ होतं. अखेरच्या क्षणीही राष्ट्रध्वजाचं कवच कुंडल मिळतं. हौतात्म्याचा अमरपट्टा मिळतो. मातृभूमि तळमळते. सामान्य बिचारे उरतात आप्तांच्याच स्मृतीत, एक - दोन पिढ्यांपुरते. मालमत्तेच्या वाटणीपुरते. पिलांच्या चोची उघडझाप करू लागतात जगण्यासाठी. घर रडत राहातं. रुग्णालयात खितपण पडणारे मात्र ’सुटतात’, त्यांच्या सुटकेकडे डोळे लावलेले टाकतात निश्वास. रितेपण जाणवतं त्या खाटेला पण तिही जरा मोकळी होते. घरातला तो कोपरा आठवणीत असतो सुश्रुशा करणार्यांंच्या आणि वाट पाहणार्यांंच्याही. सावकाराचा, दुष्टाचा तिथूनच सुरू होतो नरकाचा प्रवास. लोकरुढी म्हणून होतेे गर्दी सहानुभूती नसलेली. ओरबाडणार्या हातांच्या मुठी रित्या झाल्याचे बघण्यासाठीच. तर समाजासाठी झिजलेल्याच्या चितेचा दरवळ जाणवतो चंदनासारखा. हजारो पोरके झालेले भासतात तिथे. कफनीधारी एखाद्यासाठी थांबतं संपूर्ण शहर. टाहो फोडतात अनुयायी अन् निघतात नव्या नेतृत्वाच्या शोधात. चुकचुकतात संवेदनशील मनं तरुणांच्या मृत्यूनं. राखरांगोळी होते सुरकुतलेल्या डोळ्यातील स्वप्नांंची. जगण्यापेक्षा काय होतं मोठं याची चर्चाही घडते. सृजनाचा ध्यास घेतलेल्या लेखक, कवी, अभियंते सोडून जातात पांढर्या कागदावर उमटलेल्या काळ्या रेघा. एखाद्या लेखात, कवितेतील एखाद्या शब्दात किंवा एखादा - पूल, इमारतीच्या कोनशिलेवर घट्ट ठसा उमटतो त्यांचा.
शिक्षकाचं मरण या सगळ्यांपेेक्षा वेगळं... कोण म्हणतो, शिक्षक मरतो? तो तर चिरंजीव आहे, असायलाच हवा. पराक्रम गाजविणार्या त्याच्या विद्यार्थ्यांच्या रुपात कधी तो चिरंजीव परशुराम आहे, तर अपयशी ठरणार्या विद्यार्थ्यांच्या धडपडीचा तो अश्वत्थाम्यासारखा साक्षीदार आहे. तो तर जनक आहे, शेकडो, हजारो, लाखो बिजं तयार करणार्या एका बियाण्याचा. कुठेही रुजणारी क्षमता निर्माण करणारा तो तर अभियंता. भविष्य घडविण्यासाठी प्रकाशवाट दाखविणारा साक्षात जग्नियंताच. आपल्यातील ज्ञानकण संपर्कातील काजव्यांंना वाटणारा तो साक्षात सूर्य. मातीच्या गोळ्यांना वास्तावाच्या भट्टीत लोटण्यापूर्वी आकार देणाराही तोच. तोच तर निर्माण करतो ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मकही. तोच असतो पांडवांच्या सहिष्णुतेत आणि तोेच असतो कौरवांच्या सत्तापिपासेत, तोच असतो द्रोणाचार्य. तोच असतो मार्गदर्शक आणि शिल्पकारही जीवनाचा. तोच तर अमरत्वाचा मार्ग चोखाळण्याचा शक्तीदाताही. शिक्षकच तर असतो वटवृक्ष... हजारो पारंब्यांंचा पसारा सांंभाळणारा. त्याच पारंब्यांतून निर्माण होतो त्याचाच वंश. एक वठल्यानंतर पुन्हा नव्याने रुजतोे त्याचाच विचार, त्याचीच शिकवण... पिढ्यान् पिढ्या. प्रत्येक विजयामागे असतो त्याचाच विजय अन् अपयशामागे त्याचाच पराभव. म्हणूनच वटवृक्षाचं उन्मळून पडणं हा केवळ भास असतो... तो तर तिथेच असतो निश्चल उभा... कोवळ्या पारंब्यांच्या जिद्दीला बळ देण्यासाठी
Comments
Post a Comment